Press "Enter" to skip to content

हंडाभर पाण्यासाठी गावकऱयांनी खोदला खड्डा

Spread Post

आग ओकणारा सूर्य.. पाणीबाणी तर पाचवीलाच पूजलेली.. पाण्याचा टँकर तरी पाठवा हो… असा टाहो फोडूनही सरकारी अधिकाऱयांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. अशा वेळी करायचे तरी काय? या विचाराने डोहरेपाडय़ातील गावकरी हैराण झाले. अखेर हार न मानता लहान मुलांपासून तरुण, वृद्ध सारेच एकत्र आले आणि त्यांनी श्रमदान करून पाण्यासाठी थेट मोठा खड्डाच खोदला. स्वत:चा जीव धोक्यात घालून डोहरेवासीयांनी अखेर आपल्या जिद्दीचे दर्शन घडवले.
जव्हार तालुक्याला सध्या भीषण पाणीटंचाईने ग्रासले असून 30 गावपाडय़ांना फक्त सहा टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याच तालुक्यातील डोल्हारा या गावात एका महिलेला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागला होता. आता डोहरेपाडा सध्या चर्चेत आला असून जेमतेम चारशे लोकवस्ती आहे. पाणीच नसल्याने किमान टँकरने तरी पुरवठा करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी सरकारी यंत्रणेकडे केली होती. याबाबतचा प्रस्तावदेखील पाठवला, पण सरकारीबाबूंनी त्याकडे दुर्लक्ष केले. येथे पाझरतलाव बांधावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली होती, पण त्याकडेही लक्ष दिले गेले नाही.
पाणीच नसल्याने दैनंदिन व्यवहार करायचे तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर सर्व आबालवृद्धांनी एकत्र येऊन श्रमदान करायचे ठरवले. कुणी शिडी आणली तर कुणी कुदळ, फावडी आणि घमेले. मेहनत करून तब्बल बारा तास खोल खड्डा खोदण्यात आला. सर्वांनीच पाण्यासाठी स्वतŠचा जीव धोक्यात घातला, पण कामगिरी फत्ते करून पाणी मिळवले. ग्रामस्थांच्या एकजुटीचे व मेहनतीचे एकीकडे कौतुक होत असतानाच दुसरीकडे सरकारी अनास्थेबाबत तीक्र संताप व्यक्त होत आहे.

वरातीमागून घोडे

डोहरेपाडा येथील गावकऱयांनी श्रमदान करून पाण्यासाठी खड्डा खोदल्यानंतर सरकारी अधिकारी जागे झाले आणि गेल्या चार दिवसांपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. मात्र हे शहाणपण आधी का सुचले नाही, असा संतप्त सवाल डोहरेपाडय़ावरील ग्रामस्थांनी केला आहे.

More from GondiaMore posts in Gondia »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 − 1 =