fbpx Press "Enter" to skip to content

देशाच्या आरोग्य सेवेत सहकाराचे मॉडेल राबवावे, डॉ. अनिल काकोडकर यांचे मार्गदर्शन

Spread Post

हिंदुस्थान आरोग्य क्षेत्रात खूप मागे आहे. या क्षेत्रात गुंतवणूक वाढत असली तरी कोणी त्यातील मूळ समस्येला हात घालत नाही ही या क्षेत्राची शोकांतिका आहे. जर सेवाभावी वृत्ती असेल तर ते क्षेत्र पुढे जाते. आरोग्य क्षेत्रात आणखी सक्षम करायचे असेल तर देशातील आरोग्य सेवेमध्ये सहकार क्षेत्राचे मॉडेल राबवले पाहिजे, असे मार्गदर्शन ‘पद्मभूषण’ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
शुश्रूषा को-ऑपरेटिव्ह रुग्णालयाचा सुवर्ण महोत्सव रविवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरामध्ये पार पडला. यावेळी डॉ. अनिल काकोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शुश्रूषा रुग्णालयाचे अध्यक्ष सुभाष दांडेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे,  सारस्वत को-ऑप बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर, डॉ. एन. एस. लाड आदी उपस्थित होते. यावेळी शुश्रूषा रुग्णालयाच्या 50 वर्षांचा वेध घेणार्‍या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
एखाद्या रुग्णालयाच्या डॉक्टरांचे बलस्थान हे त्याच्या रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग असतो. शुश्रूषा रुग्णालयाचा सेवाभावी कर्मचारी वर्गच त्याचे बलस्थान आहे असे कौतुक राज ठाकरे यांनी केले. हे रुग्णालय मराठी माणसाने उभे केले. भविष्यात ते मराठी माणसाच्या हातात राहावे अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. देशाच्या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रावर अन्य देशांच्या तुलनेत कमी खर्च करतो. या क्षेत्रात खासगीकरण वाढत आहे. त्यावर अंकुश ठेवायचा असेल आरोग्य क्षेत्रात सहकार चळवळ वाढवली पाहिजे, असे मत गौतम ठाकूर यांनी व्यक्त केले.
शुश्रूषा रुग्णालय गुणवत्तेमध्ये कधीच कमी पडले नाही. निष्णात डॉक्टरांमुळे सेवाभावी वृत्तीमुळे हे रुग्णालय एवढा मोठा पल्ला गाठू शकले, अशा भावना सुभाष दांडेकर यांनी व्यक्त केल्या.

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 + nineteen =